रायगड :-(नरेश पाटील): जिल्ह्यात वाढती महागाई, पेट्रोल-डिझेलच्या सतत वाढणाऱ्या किंमती, घरगुती गॅसचे दर आणि सर्वसामान्यांच्या जीवनावर ओढवलेले आर्थिक संकट या पार्श्वभूमीवर अलिबाग येथे काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आलेल्या अनोख्या आंदोलनाने संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतले. शुक्रवार दिनांक २९ मे २०२६ रोजी सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पार पडलेल्या या आंदोलनात सरकारच्या धोरणांविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली...
रायगड जिल्हा काँग्रेसचे धडाकेबाज अध्यक्ष श्री. राजाभाऊ ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आणि अध्यक्ष डॉ. मनीष पाटील, अध्यक्षा डॉ. श्रुती म्हात्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या आंदोलनात मोठ्या संख्येने कार्यकर्ते, महिला, युवक आणि नागरिक सहभागी झाले होते. मात्र आंदोलनातील सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला तो एक प्रभावी आणि उपरोधिक संदेश देणारा बॅनर...
पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि उद्योगपती गौतम अदानी यांच्या छायाचित्रांसह तयार करण्यात आलेल्या या बॅनरमध्ये “वाह रे भाजपा सरकार...” असा थेट सवाल उपस्थित करण्यात आला होता. “भारतीयांना पुन्हा जंगलात जाण्याची वेळ येणार आहे” या आशयातून देशातील सध्याच्या आर्थिक परिस्थितीवर तीव्र भाष्य करण्यात आले. पेट्रोल नाही, डिझेल नाही, गॅस नाही, रोजगार नाही, शिक्षण नाही, आरोग्य सेवा नाही अशा शब्दांत सामान्य नागरिकांच्या भविष्यातील चिंतेचे चित्रण करण्यात आले होते...
विशेष म्हणजे जंगलातील जीवनाचे चित्रण करून आंदोलनकर्त्यांनी एक गंभीर संदेश देण्याचा प्रयत्न केला. वाढत्या महागाईमुळे सामान्य माणसाचे जीवन दिवसेंदिवस कठीण होत चालले असून भविष्यात मूलभूत गरजांसाठी संघर्ष करावा लागेल, अशी भीती या आंदोलनातून व्यक्त करण्यात आली. अनेक नागरिकांनी आंदोलनस्थळी थांबून बॅनरमधील संदेश वाचला आणि देशाच्या सद्यस्थितीबाबत चिंता व्यक्त केली...
काँग्रेस नेत्यांनी सांगितले की, हे आंदोलन केवळ राजकीय विरोध नसून जनतेच्या मनातील वेदना आणि अस्वस्थतेला वाचा फोडण्यासाठी करण्यात आले आहे. इंधन दरवाढीचा परिणाम शेती, वाहतूक, व्यापार, किराणा आणि सर्वसामान्यांच्या घरखर्चावर होत असून आर्थिक ताण प्रचंड वाढला आहे...
आज देशातील सामान्य नागरिक महागाई, बेरोजगारी आणि असुरक्षिततेच्या सावटाखाली जीवन जगत आहे. सरकारने तातडीने इंधन दर कमी करून जनतेला दिलासा द्यावा, अन्यथा येणारा काळ अधिक कठीण आणि भयावह ठरू शकतो, असा इशाराही आंदोलनातून देण्यात आला...
अलिबागमध्ये पार पडलेले हे आंदोलन आणि विशेषतः त्यातील प्रभावी बॅनर सध्या रायगड जिल्ह्यासह राज्यभर चर्चेचा विषय ठरत असून, वाढत्या महागाईविरोधातील जनतेच्या तीव्र भावना पुन्हा एकदा अधोरेखित झाल्या आहेत...
