देवलापार मधील सर्व्हे नं. २६८/२ पहन २९ येथील थरारक घटना
प्रतिनिधी सचिन चौरसिया
रामटेक:नागपूर जिल्ह्यातील पेंच व्याघ्र प्रकल्पालगतही आता मानव-वन्यजीव संघर्ष सुरूच आहे... तालुक्याच्या या विशेषता देवलापार या आदिवासीबहुल भागात बिबट्या तसेच वाघांचे हल्ले थांबण्याचे चिन्हे सध्या तरी दिसून येत नाही आहे. शेतात काम करीत असलेल्या महिलेवर वाघाने हल्ला करून ठार केले. ही घटना मंगळवार (ता.२८) देवलापारमधील सर्व्हे क्र. २६८/२ पहनं २९ येथे घडली. मृत महिलेचे नाव विमला काशिनाथ इनवाते (वय ६७) असे आहे... या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे...
व्याघ्रप्रकल्पाच्या बफर, प्रादेशिक वनक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात हळूहळू वाढ होत आहे. मृतक विमला देवलापार भागातील झिंजेरिया या गावत भाऊ दिनकर कुंभरे यांचेकडे भाऊबीजेसाठी आली होती. दिनकर कुंभरे यांचे शेतात घर आहे आणि शेतालाच लागुन जंगल आहे... मंगळवारी सकाळी नऊ वाजताच्या सुमारास देवलापार वनपरिक्षेत्राअंतर्गत येणाऱ्या देवलापार मधील सर्व्हे क्र. २६८/२ पहन २९ मौजा देवलापार येथील शेतात कापूस काढत असताना लोहडोंगरी येथील रहिवासी विमला ईनवाते यांच्यावर वाघाने हल्ला केला. देवलापार येथील कक्ष क्र. ५८१ राखीव वनालगतच्या शेतात महिलेला ओढत नेऊन वाघाने ठार मारले. दरम्यान माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले व दुपारी दीड वाजता विमला काशीराम इवनाते यांचा मृतदेह शवविच्छेदनाकरिता उपजिल्हा रुग्णालय, रामटेक येथे पाठविण्यात आला... शवविच्छेदन झाल्यानंतर अत्यंविधीकरिता पोलिस विभागामार्फत कुंटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आला. मृतकाच्या वारसादाराला १० लाख रुपयांचा मृतदेह नुकसानभरपाईचा धनादेश डॉ. विनीता व्यास (भा.व.से.) उपवनसंरक्षक नागपूर (प्रादे.) यांच्या मार्गदर्शनाखाली जी. एफ. लुचे सहायक वनसंरक्षक (जंकास- १) रामटेक यांचे हस्ते देण्यात आला... यावेळी पोलिस उपअधीक्षक संतोष गायकवाड, मानद वन्यजीव रक्षक नागपूर अविनाश लोंढे, वनपरिक्षेत्र अधिकारी एस. बी. टुले, एस. एस. बन्सोड, राहुल शिंदे, ठाकरे आदी उपस्थित होते...
