महाराष्ट्र वेदभुमी

खांदाडमध्ये अंधाराचे साम्राज्य; दिवे बंद, अंधारात मगर फिरली

माणगाव :- (नरेश पाटील): माणगाव शहरात खांदाड गावातील अनेक रस्त्यांवरील दिवे बंद असल्याने नागरिकांना गंभीर त्रास सहन करावा लागत आहे... या अंधाराचा फायदा घेत मगर, साप, विंचू यांसारखे धोकादायक सरपटणारे प्राणी वस्ती भागात शिरकाव करत आहेत...

     मंगळवारी (११ नोव्हेंबर २०२५) उशिरा रात्री भिमसेन वालेराव यांच्या घराजवळ मगर फिरताना दिसली... या ठिकाणी कायम अंधार असल्याने तातडीने एक पोललाईट बसविणे आवश्यक असल्याची मागणी नागरिकांनी केली आहे... येथे कच्चा रस्ता असून, रहिवासी अंधारात मोबाईलचा टॉर्च वापरून मार्गक्रमण करत आहेत...

     गावातील सुनील धुमाळ, डोंगरे ते वालेराव मार्ग आणि महेश पोवार (बाळा डीजे) परिसरातील तीन प्रमुख रस्त्यांवरही दिवे बंद आहेत... सुनील धुमाळ यांनी माणगाव नगर पंचायतकडे लेखी तक्रार दिली असली तरीही अद्याप दुरुस्ती झालेली नाही...

    स्थानिकांचे म्हणणे आहे की, रस्त्यांवरील दिवे वारंवार बंद पडतात आणि तक्रार नोंदवल्याशिवाय ते चालू केले जात नाहीत... तक्रार दिल्यानंतरही आठवडेन्‌आठवडे कारवाई होत नाही...

     गेल्या तीन वर्षांपासून मगरदर्शनाच्या घटना सुरू असून, कोणतीही दुर्घटना न घडल्याने प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे...

    गावकऱ्यांनी दिव्यांची तत्काळ दुरुस्ती, नवीन पोललाईट बसविणे व नियमित देखरेख करण्याची मागणी केली आहे, जेणेकरून अंधारामुळे निर्माण होणारा धोका टाळता येईल...

Post a Comment

Previous Post Next Post